जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य प्रयोगशाळा

रोगनिदान व दर्जेदार तपासणी शक्य

गडचिरोली : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवनिर्मित एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी)चे उद्घाटन गुरुवारी पार पडले. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. तसेच रोगनिदान, आजारांची देखरेख व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मोठे बळ मिळणार आहे.

या प्रयोगशाळेमुळे संसर्गजन्य आजारांची तपासणी, पाणी व अन्ननमुने, विश्लेषण, पर्यावरणीय नमुन्यांची चाचणी तसेच विविध जैविक तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. परिणामी आजारांचे लवकर व अचूक निदान होऊन वेळेत उपचार सुरू करता येणार आहे. त्यातून संभाव्य साथरोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी ही इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी म्हणजे राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी असल्याचे नमूद केले. या सुविधेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही दर्जेदार, विश्वसनीय व अचूक तपासणी सेवा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे, तसेच वरिष्ठ प्राध्यापक डॉ.नितीन टिपले उपस्थित होते. यावेळी सामान्य रुग्णालयातील शरीरविकृती शास्त्रज्ञ डॉ.सचिन करंजेकर, डॉ.मुकुंद ढबाले यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्राध्यापक, सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत या प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, वेगवान व लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.