स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता ‘करो या मरो’ आंदोलन

युवा पिढीलाही जागृत करणार

गडचिरोली : राज्यावर वाढत असलेला कर्जाचा बोझा आणि विविध विभागांची कोट्यवधी रुपयांचे थकबाकी पाहता विदर्भाचा अनुशेष भरून काढणे सरकारला शक्य नाही. यात विदर्भाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे विदर्भ राज्य वेगळे झाल्याशिवाय या भागाच्या विकासाला चालना मिळणार नाही. त्यामुळे आता ‘करो या मरो’ अशी भूमिका घेऊन 2027 संपण्यापूर्वी विदर्भ राज्य मिळविणारच, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॅड.वामनराव चटप यांनी व्यक्त केला.

यावेळी अॅड.चटप म्हणाले, आतापर्यंत आम्ही युवा पिढीत या आंदोलनाची धग पोहोचवली नव्हती. मात्र आता ती वेळ आली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने 120 वर्षांपासून ही मागणी लावून धरली आहे. आता तिसरी पिढी या आंदोलनाची मशाल सांभाळत आहे. महाराष्ट्र राज्याचे महसुली उत्पन्न 5 लाख 60 हजार 963 कोटी रुपये आहे, मात्र राज्यावर असणारा कर्ज व व्याजाचा बोझा 9 लाख 83 हजार कोटी रुपये आहे. याशिवाय सरकारला विविध विभागांमधील बांधकामापोटी 95 हजार 732 कोटी रुपयांची थकबाकी द्यायची आहे. एवढे पैसे देण्याची सरकारची ऐपत नाही. या दिवाळखोरीचे खरे चित्र शहरी जनतेसमोर आणून जनजागृती करण्यासाठी येत्या 16 डिसेंबर रोजी दुपारी नागपूरच्या इतवारीतील शहीद चौकातल्या विदर्भ चंडिका मंदिरापासून लाँग मार्च काढून चिटणीस पार्कवर विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा घेतला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पत्रपरिषदेला युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष सुनील चोखारे, प्रचार प्रमुख तात्यासाहेब मते, नागपूर जिल्हा समन्वयक प्रदीप शिरसकर, गडचिरोली जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, उत्तर गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, कोअर कमिटीचे सदस्य शालिक नाकाडे, तसेच राजकुमार शेंडे, चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे आदी पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते.