दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, पाचशेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे

मानधनवाढीसह पेन्शनचा प्रश्न प्रलंबित

गडचिरोली : अंगणवाड्यांवरील महिला कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन सीटू संलग्नित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरूवारी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मानधनवाढीसंदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासह पेन्शन लागू करा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून ग्रॅज्युटी लागू करा, अशा मागण्या करत नारेबाजी करण्यात आली.

या मागण्यांसंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनाला 10 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी अंमणवाडी कर्मचाऱ्यांवर टाकली, पण महिलांचे बँक खाते नसण्यापासून अनेक अडचणी असताना त्याचा विचार न करता त्याचे खापर अंगणवाडीच्या महिलांवर फोडण्याचा प्रयत्न होणार असल्याबद्दल अमोल मारकवार यांनी संताप व्यक्त केला.

हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी उज्वला उंदीरवाडे, सरीता आत्राम, माया नैनुरवार, कल्पना भोसले, रंजना चौकुडे, भागरता दुधबावरे, अर्चना ढवळे, कौशल्या गौरकार, विठाबाई भट, योगीता मुनघाटे, ललिता केदार, रेखा जाडे, छाया रामटेके, सुनंदा बावणे आदींनी परिश्रम घेतले.