विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाभर धरणे आंदोलन

तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन

गडचिरोली/सिरोंचा : स्वस्त धान्य व केरोसिन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधावे आणि शासनाकडून तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी गुरूवारी जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सिरोंचा येथे स्वस्त धान्य व केरोसिन दुकानदार संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक महासंघ ही ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्ली या केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त संघटनेशी सलग्न महासंघ आहे. दुकानदारांच्या अडीअडचणी, समस्या, मागण्या सोडविण्यासाठी ही संघटना कटीबद्ध आहे. ऑल फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशनच्या वतीने देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांचा आंदोलनाचा कार्यक्रम निश्चित झाला आहे.

अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थिती 10 जानेवारी 2024 रोजी राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक करण्यात आली. या बैठकीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जीनमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यातबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सुतोवाच मंत्र्यांकडून करण्यात आले होते. परंतू आजपर्यंत या विषयावर कोणतीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. स्वस्त धान्य दुकानदारांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांकडे शासन करीत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता, अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक महासंघाने आंदोलनात्मक पवित्रा घेतला. विधानमंळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा होऊन शासनाचे लक्ष वेधावे म्हणून राज्यभर महासंघाच्या वतीने आंदोलनात्मक कार्यक्रम घोषित करण्यात आला.