अन् त्या गरोदर महिलांना बराच वेळ रुग्णवाहिकेतच ताटकळत राहावे लागले

प्रसुतीसाठी जाताना रस्त्यातच फसली

कुरखेडा : येथील सती नदीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने आणि तात्पुरता रपटाही वाहून गेल्याने सध्या सर्व वाहतूक आंधळी-नवरगाव गावातून वळती करण्यात आलेली आहे. या गावाचे ‌रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. याचा फटका प्रसुतीसाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेलाही बसला. रस्त्यावरच्या खड्ड्यात रुग्णवाहिका फसल्याने बराच वेळ प्रसुतीकळा सहन करत महिलांना रुग्णवाहिकेत राहावे लागले.

शनिवार, दि.20 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास गडचिरोलीला जात असलेली रुग्णवाहिका मुख्य रस्त्यातच फसली. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर गावातील नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रुग्णवाहिकेला खड्ड्यातून बाहेर काढले.

आंधळीमार्गे वाहतूक वाढल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. अरूंद रस्त्यामुळे चारचाकी वाहन येण्याजाण्याकरिता रोज खोळंबा होत असतो. वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक पोलिसाची नियुक्ती करणे आणि मुख्य रस्त्यावरचे खड्डे बुजवून रस्ता रुंद करणे गरजेचे आहे. परिसरात मदत केंद्र स्थापन करून तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी आंधळी येथील उपसरपंच अप्रव भैसारे यांनी केली आहे.