गडचिरोली : जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेवरच्या तोडगट्टा येथे जिल्ह्यातील प्रस्तावित लोहखाणींविरोधात आदिवासी गावातील नागरिकांकडून गेल्या ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून धरणे आंदोलन सुरू होते. सोमवारी पोलिसांनी बळाचा वापर करत हे आंदोलन दडपल्याचा आरोप या आंदोलनासाठी पुढाकार घेणारे माजी जि.प.सदस्य अॅड.लालसू नोगोटी यांनी केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी हा आरोप खोडून काढताना पोलिसांना त्या भागात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांना ताब्यात घेतले असून कुठेही बळाचा वापर केला नसल्याचे सांगितले.
दमकोंडावाही संघर्ष समितीच्या वतीने अॅड.नोगोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी तोडगट्टाला पोलिसांनी वेढा घालून प्रमुख कार्यकर्त्यांचा शोध घेऊन दडपशाही सुरू केली. गेल्या ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या परिसरातील गावकऱ्यांचे आंदोलन उठविले. दोन दिवसांपासून परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांनी पाहणी केली जात होती. आंदोलनातील महत्वाचे कार्यकर्ते एका कार्यक्रमासाठी नवी दिल्लीत असल्याने पोलिसांनी ही संधी साधल्याचा आरोप करण्यात आला.
आंदोलनात बसण्यास गावकऱ्यांना भाग पाडले?
दरम्यान पोलिसांनी आंदोलकांच्या नेत्यांनी लावलेले आरोप खोडून काढताना आपली बाजू स्पष्ट केली. छत्तीसगड सीमेवरील वांगेतुरी पोलिस स्टेशनचे उद्घाटन केले जाणार होते. त्यासाठी पोलिस दलाचे सी-60 कमांडो तोडगट्टामार्गे वांगेतुरीकडे जात असताना आंदोलकांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. काही जणांनी पोलिस जवानांना धक्काबुक्कीही केली. त्यामुळे 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना उठविले नाही, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.
माओवादी आणि माओवादी आघाडीच्या संघटनेकडून निषेध आंदोलनात बसण्यास गावकऱ्यांना भाग पाडले जात आहे. गावकऱ्यांना या भागात रस्ता आणि मोबाइल टॉवर हवे आहेत, अशी तक्रार काही ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली. त्यामुळे त्या गावकऱ्यांना पोलिसांकडून संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी स्वत:हून आंदोलनस्थळावरील अतिक्रमण हटवले, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले
तोडगट्टा आंदोलनाबद्दल माहिती मिळाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार आणि सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख सैनू गोटा आंदोलकांना भेटण्यासाठी निघाले असता गट्टा -जांभिया पोलिस मदत केंद्राजवळ त्यांना अडविण्यात आले. संवेदनशिलतेचे कारण देवून त्यांना अडवून ठेवण्यात आल्याचे जराते यांनी सांगितले.