गडचिरोली : दुष्काळग्रस्त भागासह शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना लोकसहभागातून पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेणार्या ‘नाम’ फाउंडेशनने गडचिरोली जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्राच्या विकासाठी पुढाकार घ्यावा, असे साकडे त्यांना घालण्यात आले. मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे यांनी त्यासंदर्भातील निवेदन देऊन नामच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशनतर्फे सिंचनातून शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी योगदान दिले जाते. त्यामुळे डॉ.प्रणय खुणे यांनी नामच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यात अनेक नद्या असताना ते पाणी वाहून जाते, पण त्या पाण्याचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी होत नाही. त्यामुळे नाम फाऊंडेशनने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती डॅा.खुणे यांनी केली. नाम फाउंडेशनचे प्रकल्प संचालक गणेश थोरात व इतर पदाधिकाऱ्यांनी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात लवकरच अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचीही भेट घेणार असल्याचे डॅा.खुणे यांनी सांगितले.