गडचिरोली : गडचिरोली ते आरमोरी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्गाचे (353-C) चौपदरीकरण करण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीच्या या मार्गावर सुरक्षित आणि सुलभ प्रवास करणे शक्य होईल, अशी माहिती माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) डॅा.अशोक नेते यांनी दिली.
डॉ.नेते गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांनी यासंदर्भात वारंवार मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
असा राहणार चौपदरीकरण प्रकल्प
मार्ग : आरमोरी ते गडचिरोली (NH-353C), लांबी : 36.900 किमी, अंतर : 77.900 किमी ते 114.800 किमी, कामाचा प्रकार : पुनर्वसन व उन्नतीकरण करून चौपदरीकरण मानकात रुपांतर, पद्धत : हायब्रिड अॅन्युईटी मोड (HAM)
वनविभागाच्या अडथळ्यांवर मात
या रस्त्याच्या उभारणीत सर्वात मोठी अडचण म्हणजे वन विभागाची मंजुरी होती. त्यामुळे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात विलंब होत होता. मात्र मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी सततच्या पाठपुराव्यामुळे या अडचणीवर मात करण्यात यश मिळवले. या प्रकल्पाला मिळालेल्या मंजुरीबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘गडचिरोली–आरमोरी मार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत होता. गडचिरोली नागपूर हा महामार्गावर असल्याने हा रस्ता सर्वात रहदारी व वर्दळीचा आहे. जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या या मार्गावरल लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यामुळे नागरिकांच्या या महत्त्वाच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. या संदर्भात पाठपुरावा करून मदत करणारे राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.’