रिक्त पदांवर निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या कराल तर शाळांना टाळे ठोकणार

आझाद समाज पार्टीचा निवेदनातून इशारा

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत अनुसूचित जमातीतील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्याची सूचना सर्व जिल्हा परिषद सीईओंना देण्यात आल्या. हा आदेश म्हणजे सरकारी शाळांचे व शिक्षकांचे भविष्यात खासगीकरण करण्याचा डावच आहे. यावर वेगळ्या स्वरुपात राज्यव्यापी आंदोलन करूच, तथापि सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती करताना संदर्भीय आदेशात क्रमांक 1 मध्ये ‘नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करावी,’ ही सूचना आझाद समाज पार्टी कदापीही मान्य करणार नाही, असे निवेदन या पक्षाच्या वतीने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना देण्यात आले.

ज्याअर्थी जिल्ह्यात अनुसूचित जमातीतील स्थानिक बेरोजगारांची एका बाजूला प्रचंड मरमर होत असताना आणि जिल्ह्यात हजारोच्या संख्येने डीएड्, बीएड्, एमएड् तथा पदवीधर उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र असताना प्रशासन जर 58 वर्षापर्यंत नोकरी केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करून बेरोजगारांचा खेळ मांडत असेल तर आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

सदर निवेदनाची तातडीने दखल घेऊन शासनाच्या आदेशातील निवृत्त शिक्षकांना रिक्त पदावर नियुक्त करण्याची क्रमांक 1 ची सूचना ताबडतोब मागे घेऊन जिल्ह्यातील पात्र स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी, तसे न झाल्यास ज्या शाळेत निवृत्त शिक्षक नियुक्त झाले, अशा शाळांना टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी दिला आहे.

जिल्ह्यात 84 सरकारी शाळा शिक्षकांविना आहेत. त्या ठिकाणी सुद्धा तातडीने शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी आझाद समाज पार्टीचे गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, महिला सचिव शोभा खोब्रागडे, अंकुश कोकोडे, आशिष गेडाम, सतीश दुर्गमवार, घनश्याम खोब्रागडे, महेंद्र गेडाम आदी उपस्थित होते.