गडचिरोली : शाळा सुरू होऊन 3 महिने पूर्ण होत आहेत, मात्र अद्याप जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेतील मुलांना गणवेश नाही. एकीकडे कुणाचीही मागणी नसताना राजकीय स्वार्थापोटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, योजनेसह त्याच्या प्रसिद्धीवर अतोनात पैसा उडवला जात आहे, पण गोरगरीबांच्या पाल्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी सरकारकडे पैशाची कमतरता आहे, असा आरोप आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश वाटपासाठी उशिर होत आहे. त्याचे कारण शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ही योजना पूर्वी शालेय व्यवस्थापन समितीकडे असल्याने विलंब होत नव्हता आणि गणवेशाच्या मापात फरक पडत नव्हता. परंतु यावर्षी शासनाने अचानक माविमं कडे हे टेंडर दिले. त्यांच्याकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने आणि गणवेशाच्या मापाबाबत अनुभव नसल्याने अधिक वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात 12 तालुके मिळून एकूण 68 हजार 235 विद्यार्थी आहेत. आतापर्यंत जवळपास 35 हजार मुलांना गणवेश वितरित झाले आहेत. खऱ्या अर्थाने ज्या दुर्गम भागात गोरगरीब मुले राहतात, त्या कोरची, मुलचेरा, सिरोंचा भागात गणवेश वितरण अत्यंत कमी प्रमाणात झाले. भामरागड, एटापल्ली तालुक्यात गणवेश पोहोचलेच नसल्याचा आरोप आझाद समाज पार्टीने केला.
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना 30 सप्टेंबरच्या आत गणवेश वितरित झाले नाही तर आंदोलन सुरू करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा संघटक हंसराज उराडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम बांबोळे, गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे यांनी निवेदनातून दिला आहे.