आर्थिक वर्षाच्या अखेरची लगबग, जिल्हा बँक सुटीतही सुरू राहणार

गुढीपाडवा, ईदलाही मिळणार सेवा

गडचिरोली : वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षाचे अखेरचे 3 दिवस शासकीय सुट्यांचे आहेत. पण आर्थिक व्यवहारांची पूर्तता आणि हिशेबासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या या दिवसांमुळे सुटीच्या काळातही बँकिंग सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे.

रविवार (गुढीपाडवा) दि.30 आणि सोमवार (ईद) दि.31 ला शासकीय सुटी असली तरी जिल्हा बँकेच्या 57 शाखा नागरिकांसाठी सुरू राहून बँकेचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी कळविले. विशेषत: शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेण्यासाठी हा काळ महत्वपूर्ण ठरणार आहे.

मार्च 2025 च्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांची पीक कर्जाची रक्कम भरण्यासाठी लगबग राहते. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर कर्जाची रक्कम भरल्यास अधिक व्याजदर लागतो. त्यामुळे सुटीच्या दिवशीली बँका सुरू ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि इतर शासकीय कार्यालयांशी संबंधित शासकीय व्यवहारांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.