नोकरीच्या फसव्या जाहिराती, बेरोजगारांनो, बळी पडू नका !

जिल्हा परिषदेने केले सावध

गडचिरोली : सध्या काही समाजकंटकांकडून नोकरीसंदर्भात बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित होत आहेत. अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेवून आपली आर्थिक किंवा वैयक्तिक फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

जिल्हा परिषद किंवा त्याअंतर्गत येणारे कोणतेही शासकीय कार्यालय नोकरी भरती प्रक्रियेत कधीही पुढील गोष्टी करत नाही. अर्ज शुल्क म्हणून थेट पैशाची मागणी, नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी किंवा निवड निश्चित करण्यासाठी अर्जदारांकडून कोणत्याही खासगी बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जात नाही. खासगी संपर्क माध्यमांचा वापर, नोकरीच्या जाहिरातींसाठी शासकीय संपर्क माध्यमांऐवजी केवळ खासगी किंवा वैयक्तिक मोबाईल क्रमांकांचा वापर केला जात नाही.

फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी काय करावे

1) सत्यता तपासा- नोकरीच्या कोणत्याही जाहिरातीची सत्यता फक्त आणि फक्त शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (वेबसाईटवर) तपासावी.

2) संशयास्पद मागण्यांकडे दुर्लक्ष करा – नोकरीच्या बदल्यात त्वरित पैसे भरण्यास सांगणाऱ्या किंवा वैयक्तिक बँक माहितीची मागणी करणाऱ्या कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा संदेशांकडे दुर्लक्ष करावे.

3) अधिकृत संकेतस्थळ- शासकीय नोकऱ्या केवळ विहित कार्यपद्धतीनुसार आणि शासकीय प्रक्रियेद्वारे जिल्हा परिषद गडचिरोलीच्या https://zpgadchiroli.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात देऊनच भरल्या जातात.

नागरिकांनी बनावट जाहिरातींवर विश्वास न ठेवता, फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे आणि शासकीय भरतीसाठी केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.