देसाईगंज : आतापर्यंत वाघ आणि रानटी हत्तींच्या दहशतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या देसाईगंज तालुक्यातील नागरिकांपुढे आता अस्वलाचे नवीन संकट घोंघावत आहे. तालुक्यातील डोंगरमेंढा, कोरेगाव, चोप परिसरातील जंगलालगतच्या शेतशिवारात अस्वलाचा वावर दिसून आला.
देसाईगंज तालुक्यात काही दिवसांपासून अस्वलाचा वावर वाढला आहे. अगदी शेतशिवारातही अस्वलाचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी अस्वलाचा वावर कोरेगाव, जुनवानी हनुमान मंदिर व नवतळा शेत परिसरात होता. आता चोप, डोंगरमेंढा शेतशिवारात व गावाशेजारी अस्वलाचे अस्तित्व आढळले आहे.
दोन दिवसांपूर्वी चोप येथील लिलेश्वर पर्वते यांच्या शेताकडे अस्वल दिसले. सायंकाळी 5.30 वाजता शेतातून गावाकडे येताना दोन शेतकऱ्यांना हे अस्वल दिसले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली . त्यामुळे वनविभाग सतर्क झाला आहे. ते अस्वलाच्या हालचालींकडे लक्ष देऊन आहेत. नागरिकांनी अंधारात शेतात जाणे टाळावे, अस्वल दिसल्यास कुठलाही हल्ला न करता दूर जावे, एकटे झुडपी जंगलात व शेतात जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.