महामार्गावरील पूल अपूर्ण, प्रशासनाकडून नावेची सोय

नदीपात्रातून न जाण्याचे आवाहन

भामरागड : येथून छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील लाहेरी ते गुंडेनूर दरम्यान दोन नाल्यांवर उभारल्या जात असलेल्या पुलांचे काम अर्धवट आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरीक पाण्याच्या प्रवाहातून धोका पत्करत नाला ओलांडत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे भामरागड तालुका प्रशासनाने लगेच त्या ठिकाणी नावेची सोय करत कोणही धोकादायक पद्धतीने नदीतून मार्ग काढू नये, असे आवाहन केले आहे.

लाहेरी ते गुंडेनूरदरम्यान असलेल्या दोन्ही नाल्यांवर पुलांच्या उभारणीचे काम अपूर्ण आहे. सततच्या पावसामुळे नाले प्रवाहित झाले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला लाकडी पूलही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक लाहेरी, भामरागडला येण्यासाठी दोरीच्या सहाय्याने पाण्याच्या प्रवाहातून येत होते. याबाबतची माहिती मिळताच भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी त्या ठिकाणी पाहणी करून प्रशासनाच्या वतीने नावेची सोय केली. मात्र आवश्यक असेल तेव्हाच इकडून तिकडे जावे, अशी सूचना तहसीलदार बागडे यांनी केली आहे.