गडचिरोली : राज्य शासनाच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणामुळे आणि केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देऊन आर्थिक आधार देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल 104 कोटी रुपयांचा बोनस जमा झाला आणि उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 16 कोटींचा बोनस जमा होणे सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हेच यातून दिसून येते, अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॅा.अशोक नेते यांनी व्यक्त केली.
राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण 120 कोटी रुपयांचा बोनस निधी मंजूर केला आहे. यातील 104 कोटींचे वाटप यशस्वीपणे पूर्ण झाले असून, उर्वरित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणे सुरू झाले आहे. हेक्टरी 20 हजार रुपये प्रमाणे (2 हेक्टरपर्यंत) हा बोनस दिला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यामुळेच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. अनेक विरोधक या बोनसवर शंका व्यक्त करत होते, पण हे सरकार ‘बोले तैसा चाले’ या उक्तीचे खरे पालन करणारे आहे, असे डॅा.अशोक नेते म्हणाले.