आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या सोहळ्यांवर बहिष्कार

शाळेची वेळ 11 ते 5 करण्याची मागणी

गडचिरोली : आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकणार आहेत. शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करण्याच्या मागणीसाठी हे शिक्षक आज काळ्या फिती लावतील.

सध्या आश्रमशाळेची वेळ सकाळी 8.45 ते सायंकाळी 4 अशी असल्याने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सदर वेळ अत्यंत अडचणीची व गैरसोयीची आहे. आदिवासी विकास विभागाने अत्यंत आडमुठेपणाचे धोरण अवलंबून ही वेळ कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या माथी मारलेली आहे. शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 अशी करण्यात यावी यासाठी सीटू संघटनेच्या वतीने वेळोवेळी सनदशीर मार्गाने शासनास व प्रशासनास लेखी निवेदने, प्रत्यक्ष भेटीद्वारे अवगत केले आहे. आझाद मैदान मुंबई येथे 23 ऑगस्ट 2023 व 22 जुलै 2024 रोजी राज्यभरातील हजारो शिक्षकांनी सहभागी होऊन भरपावसात धरणे आंदोलन केले. पण मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही.

सध्याची वेळ बदलण्याबाबत आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासन-प्रशासनाने दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर आदिवासी विकास विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळा फिती लावून बहिष्कार टाकणार आहेत, असे आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले. या बहिष्कारामध्ये आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य कार्यकारिणीमार्फत नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांनी केले आहे.