कुरखेडा : कुरखेडा – कोरची या मार्गावर शहरालगत असलेल्या सती नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम तांत्रिक अडचणींमुळे २ महिने बंद असल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणून ते पुन्हा सुरू केले. पण हे काम संथगतीने सुरू असल्याने कुरखेडा शहर विचार मंचने यासंदर्भात आ.गजबे यांना निवेदन देताच त्यांनी पुन्हा एकदा या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून या कामाला गती देण्याचे आणि पावसाळ्यात वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही, याची हे काम पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
वनविभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम दोन महिने ठप्प होते. ही बाब निदर्शनास येताच आ.गजबे यांनी अधिकाऱ्यांकडून अडचण जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांची व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे संयुक्त बैठक घेतली. त्यातून अडचणीवर तोडगा काढण्यात यश आले आणि हे काम पुन्हा सुरू झाले. परंतु पुलाच्या बांधकामाला गती मिळाली नव्हती.
पावसाळ्यातील संभाव्य अडचण दूर करा
आ.कृष्णा गजबे यांनी अभियंता खापरे व गणवीर, तसेच कंपनीचे अभियंता नागा बाबू यांना प्रत्यक्ष बोलवून शहर विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत सती नदीच्या पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर आ.गजबे यांनी त्यांना पावसाळ्यामध्ये वाहतुकीला अडथळा येऊ नये याकरिता मजबूत असा तात्पुरता रपटा तयार करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कुरखेडा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, शहर विचार मंचचे संयोजक माधवदास निरंकारी, उपाध्यक्ष बबलू हुसेनी, उपसरपंच राम लांजेवार, सदस्य सिराज पठान, प्रा.विनोद नागपूरकर उपस्थित होते. यावेळी प्रकल्प अभियंता नागा बाबू यांचाशी चर्चा करीत यूद्धपातळीवर सदर बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.