‘रसिका’चे संचालक सुनील बुरेवार कुटुंबियांसह अडकले दुबईत

युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत

गडचिरोली : आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. अशात गडचिरोली शहरातील ‘हॉटेल रसिका’चे संचालक सुनील बुरेवार हे कुटुंबियांसह दुबईत अडकले आहे. मायदेशी सुखरूप परतण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली आहे.

सुनील बुरेवार, त्यांच्या पत्नी मेघा, मुलगी मयुरा आणि मुलगा नील हे 25 फेब्रुवारी रोजी दुबईला पर्यटनासाठी गेले होते. नियोजित कार्यक्रमानुसार 5 मार्च 2026 रोजी ते दुबई– हैदराबाद– नागपूर असा परतीचा विमान प्रवास करत येणार होते. मात्र मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.

सध्या हे कुटुंब दुबईतील एका हॅाटेलमध्ये थांबले आहे. तिकडे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ते चिंतेत आहेत. “आम्ही सध्या सुरक्षित आहोत; मात्र उड्डाणे रद्द होणे आणि सतत येणाऱ्या युद्धाच्या बातम्यांमुळे भविष्यासंदर्भात भीती निर्माण झाली आहे,” असा संदेश नील बुरेवार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. त्यांनी आपल्या मुक्कामाचा पत्ता व प्रवासाचा तपशील देत केंद्र व राज्य शासनाने हस्तक्षेप करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी विनंती केली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याची दखल घेत राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाशी तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुबईतील भारतीय दूतावासामार्फत आवश्यक ती मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.