गडचिरोली : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृतीसाठी ‘वाहन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित कॅन्सर व्हॅन मोहीम सुरू होणार आहे. 22 नोव्हेंबर ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत आहे. या व्हॅनच्या माध्यमातून मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून संशयित रुग्णांना पुढील निदानासाठी संदर्भित केले जाईल.
जिल्ह्यातील 30 वर्षांवरील महिला आणि पुरुषांनी या तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ तोंड येणे, तोंडात पांढरे अथवा लाल चट्टे दिसणे, तोंड उघडताना त्रास होणे, तसेच महिलांमध्ये असामान्य रक्तस्त्राव, दुर्गंधीयुक्त स्त्राव, स्तनात गाठ किंवा आकारात बदल अशी लक्षणे असल्यास तपासणी आवश्यक आहे.
कॅन्सर व्हॅन जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार फिरणार आहे. गडचिरोली तालुक्यात (22 ते 27 नोव्हेंबर), चामोर्शी (28 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर), मुलचेरा (10 ते 13 डिसेंबर), एटापल्ली (15 ते 17 डिसेंबर), भामरागड (18 ते 20 डिसेंबर), अहेरी (22 ते 24 डिसेंबर), सिरोंचा (25 ते 27 डिसेंबर), धानोरा (29 डिसेंबर ते 1 जानेवारी), कोरची (2 आणि 8 जानेवारी) आणि कुरखेडा (3 ते 7 जानेवारी) याप्रमाणे ही मोहीम राबविली जाणार आहे.
या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी कर्करोगाचा धोका लवकर ओळखण्यासाठी या मोहीमेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि कर्करोग तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
































