सीईओ आयुषी सिंह यांचा दुर्गम भागात दौरा, पाणी पुरवठ्यासह जाणल्या समस्या

देखभालीसाठी ग्रामपंचायतींना सूचना

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी पुन्हा एकदा जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात दौऱ्याचा सपाटा सुरू केला आहे. या दौऱ्यात त्या तालुका आणि गाव पातळीवर कार्यरत ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेविका, डॅाक्टर्स अशा सर्वांशी संबंधित कामांची पाहणी करत असल्याने सर्व यंत्रणा कामी लागल्याचे दिसून येते. नुकत्याच केलेल्या दौऱ्यात त्यांनी एटापल्ली तालुक्यातील गावांना भेटी देऊन जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण झालेल्या आणि सौर उर्जेवरील योजना व प्रगतीपथावरील नळ पाणी पुरवठा योजनांची पाहणी केली.

एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली, पुरसलगोंदी, नेंडेर, अडंगे, हेडरी, जांबिया, गट्टा या गावांना सीईओ आयुषी सिंह यांनी भेटी दिल्या. गट्टा येथील शाळेत जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. तसेच गट्टा येथील पाणी पुरवठा योजना व शाळेला पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यासंदर्भातील कामांची चौकशी केली. या दौऱ्यात त्यांनी मार्गातील छोट्या गावांना, वस्त्यांना सौर उर्जेवरील लघु नळ पाणी पुरवठा योजनांची तपासणी करून पाणी पुरवठा सुरळीत सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्याची प्राथमिक जबाबदारी ही ग्राम पंचायतींची असून शासनाद्वारे पूर्ण करून दिलेल्या योजनांचा मालकी हक्क हा ग्राम पंचायतींकडे निहित असल्याने या योजना त्यांच्याच मालकीच्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्या पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल व दुरूस्तीकडे ग्रामपंचायतींनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची सूचना त्यांनी केली. ग्रामपंचायतींनी प्रत्येक गावासाठी योजनानिहाय काळजीवाहक नेमून त्या योजना व्यवस्थित चालविण्याची सूचना सीईओंनी केली. ग्रामस्थांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी योग्य पाणीपट्टी कर आकारण्यासही त्यांनी सांगितले.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील उपस्थित होते.