गडचिरोली : राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात वर्ष 2009 पासून गावनिहाय, शाळानिहाय आणि इतर स्तरावर लाभार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 42 हजार 389 सिकलसेल वाहक आणि 3000 सिकलसेलग्रस्त रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासोबतच जन्मत: हा आजार असणाऱ्या रुग्णांची भर पडू नये यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.
सिकलसेलग्रस्त रुग्णांना क्रायसिस होऊ नये आणि वारंवार रक्त लावण्याची गरज पडू नये म्हणून हैड्रोक्सियुरिया हे औषध सुरु करण्याचे आरोग्य विभागाने ठरविले आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 1363 रुग्णांना हैड्रोक्सियुरिया हे औषध सुरु केले असून त्यांच्या आरोग्यात उत्कृष्ट असा बदल झाला आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्व गरोदर स्त्रियांची प्रसुतीदरम्यान सिकलसेल तपासणी आणि ज्या स्त्रिया वाहक किंवा रुग्ण आहेत त्यांच्या पतींची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. सिकलसेल असलेल्या जोडप्याची 20 आठवड्याच्या आत गर्भजल चाचणी करून होणारे आपत्य हे सिकलसेलचे रुग्ण तर नाही हे जाणून घेता येते. तसे आढळल्यास जोडप्यांचे गर्भपातासाठी समुपदेशन करून रुग्णाला जन्म देणे टाळता येते. (अधिक बातमी खाली वाचा)

2024-25 या वर्षांमध्ये 10 हजार 425 गरोदर महिलांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. त्यापैकी 148 स्त्रिया सिकलसेलच्या वाहक म्हणून, तर 126 जोडपी हे दोन्ही वाहक असल्याचे आढळले. अश्या सर्व 67 स्त्रियांची गर्भजल चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 स्त्रियांचे होणारे अपत्य हे सिकलसेलचे रुग्ण असेल असे आढळून आले. त्यापैकी 2 जोडप्यांनी होणारे अपत्य सिकलग्रस्त जन्माला येऊ नये व त्याने आयुष्यभर यातना सोसू नये म्हणून वैद्यकीयरित्या गर्भपात केले आहे.
नवीन जन्माला येणारे बाळ सिकलसेलग्रस्त आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये सिकलसेल वाहक असलेल्या जोडप्यांची गर्भजल तपासणी सुरु करण्यात येत आहे. तसेच नवजात बालकाला हा आजार तर नाही, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नवजात बालकाची जन्माच्या 72 तासांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी हिंद लॅबमार्फत प्रत्येक आरोग्य संस्थेत सुरु करण्यात येत आहे.
सन 2023 पासून एकूण 17 हजार 139 नवजात बालकांची तपासणी करण्यात आली आहे. येत्या काळात सर्वच नवजात बालकांची तपासणी प्रत्येक आरोग्य संस्थांवर करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल हा आजार पुढच्या पिढीत होऊ नये म्हणुन लग्नापूर्वी तपासणी आणि 2 सिकलसेल आजाराच्या वाहकांचे लग्न होऊ नये म्हणून प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर आरोग्य कर्मचारी हे समुपदेशन करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले.
उपकेंद्र स्तरावर पेशंट सपोर्ट ग्रुप स्थापन करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फ सर्व सिकलसेल वाहक आणि रुग्ण व्यक्तीना नियमित औषधौपचाराकरीता, आरोग्य तपासणीसाठी आणि समुपदेशनासाठी पाठपुरावा घेण्यात येणार आहे. हे कार्यक्रम राबविण्यासाठी व कार्यक्रमाच्या सनियंत्रणासाठी ‘पाथ’ आरोग्य विभागासोबत कार्यरत असल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली.