गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक, विद्यार्थ्यांची तपासणी, निदान निश्चिती, उपचाराकरिता जिल्हा महिला व बाल रुग्णालयात संदर्भ सेवा कक्ष स्थापित करण्यात आला. त्यात जन्मजात असणारे आजार, शारीरिक व बौद्धिक विकासात्मक वाढीतील दोष, जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवणारे आजार, बालपणातील आजार व इतर आढळलेल्या बालकांच्या आरोग्य तपासण्या व उपचार केले जातात. याअंतर्गत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात 48 बालकांची शस्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
बालकांच्या शस्त्रक्रियेच्या निदान व नियोजनाकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार साळुंखे, डॉ.बागराज धुर्वे, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिर व सीएमई-प्रशिक्षणात हर्निया, हायपोस्पाडीस, हायड्रोनेफ्रोसिस, अनडिशेंडेड टेस्टीस, फायमोसिस आदी अनेक तपासण्या करण्यात आल्या. बालरोग तज्ज्ञ डॉ.तारकेश्वर उईके व डॉ.प्रशांत पेंदाम यांच्या उपस्थितीत सदर तपासणी झाली. याशिवाय नागपूर येथील वरिष्ठ बालरोग चिकित्सक डॉ.राऊत व लता मंगेशकर रुग्णालयाची चमू उपस्थित होती.
राज्यस्तरावर सामंजस्य करार असलेल्या रुग्णालयाशी समन्वय साधून वेळोवेळी उच्चस्तरीय शल्यचिकित्सक विशेषज्ज्ञ सल्ला सेवा, गरजेनुसार उच्चस्तरीय विशेष चाचण्या व इतर प्रक्रियांचे सनियंत्रण करून डीईआयसी मार्फत शस्त्रक्रियेकरिता तृतीयस्तरावर संदर्भित करण्यात येणार आहे.
यापूर्वी जन्मजात आजाराच्या निदान निश्चितीकरिता व तपासणीसाठी गडचिरोलीच्या रुग्णाला नागपूर, मुंबई, पुणे येथे जावे लागत असे. पण ते सर्व पालकांना शक्य होत नसल्याने बऱ्याच बालकांना निदान व उपचारापासून मुकावे लागत होते. त्यांच्यासाठी महिला व बाल रुग्णालयातील हे केंद्र पर्वणी ठरले आहे.