Home पब्लिक प्रॉब्लेम राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

कंत्राटदाराविरूद्ध घेतली सुनावणी

गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेची स्वतःहून (सुमोटो) दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून शुक्रवारी सुनावणी घेतली. खराब रस्त्यांच्या गंभीर प्रश्नावर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला.

शासकीय निविदेनुसार महामार्गाचे बांधकाम, डांबरीकरण, दुरुस्ती आणि देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असताना, रस्त्यांची दुरवस्था झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या निष्काळजीपणाची स्वतः दखल घेत जिल्हाधिकारी पंडा यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध प्रकरणाची नोंद करून सुनावणी घेतली.

ही कारवाई ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023’ मधील कलम 150 ते 152 अंतर्गत करण्यात आली. या कलमांनुसार सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता आणि सुविधांवर प्रतिकूल परिणाम घडविणाऱ्या उपद्रवात्मक कृतींवर दंडाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त आहेत.

सदर सुनावणीदरम्यान “शासकीय कामांमध्ये गुणवत्ता आणि जबाबदारी बंधनकारक असून सार्वजनिक कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्ध नियमितपणे सुनावणी घेवून कठोर कारवाई केली जाईल”, असे पंडा यांनी स्पष्ट केले.