अखंड वीज पुरवठा देण्यासह ग्राहकांच्या समस्या सोडवा

जिल्हाधिकारी पंडा यांच्या सूचना

गडचिरोली : विद्युत पुरवठा हा ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाचा कणा आहे. मात्र विद्युत वितरण विभागाच्या कामकाजावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. विभागाने कामकाजाची गती वाढवून अखंड व दर्जेदार वीजपुरवठा देत नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. सोबतच प्रत्येक ब्रेकडाऊनचे ॲनालिसिस करून तांत्रिक उपाययोजना ठरविण्याचे, तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची सूचना करण्यात आली.

महावितरण विभागाचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता हितेश पारेख, जितेंद्र वाघमारे, भारतभुषण अवघड, उपकार्यकारी अभियंता सचिन कोहाड तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते.

अहेरी उपकेंद्रावर जास्त लोडचा प्रश्न

अहेरी येथील 11 केव्ही लाईनवर वाढत्या लोडमुळे वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सबस्टेशनवरील लोड कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि लोड बॅलन्सिंगचा आराखडा तयार करण्यास सांगितले. तसेच 11 केव्ही लाईनच्या विस्तार व सुधारणा खर्चाचा सविस्तर तांत्रिक आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले.