‘त्या’ गरोदर महिलेला झालेल्या त्रासासाठी थेट राज्य महिला आयोगाकडेच तक्रार

महिलेची सुरक्षित आणि नॅार्मल प्रसुती

गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागातील जेवारी संदीप मडावी या 22 वर्षीय गरोदर महिलेला प्रसुतीसाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात आणताना एक नाला पार करण्यासाठी जेसीबीच्या ओंजळीत बसावे लागल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. दरम्यान या पद्धतीने त्या महिलेला झालेला त्रास हा मानवी चुकांमुळे झाला असल्याने आरोग्य सेवा आणि सन्मानपूर्वक जगण्याच्या महिलेच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या प्रकाराची तक्रार राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली. दरम्यान भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात त्या महिलेची सुरक्षित आणि नॅार्मल प्रसुती झाली असून बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याचे डॅा.भूषण चौधरी यांनी सांगितले.

भामरागड तालुक्यातील जेवारी मडावी या आदिवासी महिलेला प्रसुतीसाठी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले जात असताना नाला ओलांडता न आल्याने जेसीबीच्या ओंजळीत (माती खोदण्याचा पंजा) बसवून नाला ओलांडण्यास भाग पाडण्यात आले. वास्तविक कुडकेली-भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर तात्पुरता बनवलेला पूल पाण्याने वाहून गेल्याने ही स्थिती उद्भवली. पावसाळ्यात या भागात निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पूर्वमाहीती असताना देखील तत्परतेने रस्ता व पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. याचा परिणाम सामान्य नागरिकांना सोसावा लागतोय. त्यातूनच त्या गरोदर महिलेच्या आरोग्यसेवा व सन्मानपूर्वक जीवनाच्या अधिकाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष राज बन्सोड यांनी राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे. मानवी चुकीमुळे हा प्रकार घडला असून त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार, प्रत्येक नागरिकाला मुबलक वैद्यकीय सेवांचा व योग्य रस्त्यांचा मूलभूत अधिकार आहे. सदर घटनेत महिलेच्या या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पावसामुळे तयार होणाऱ्या गंभीर समस्यांची माहिती असून देखील योग्य पर्यायी मार्ग तयार न करता रस्त्याचे काम सुरु करण्यात आले, ही प्रशासनाची मोठी चूक आहे. ज्यामुळे नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे राज बन्सोड यांनी सांगितले. संविधानिक आणि कायदेशीर चौकटीत राहून जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत राहू, असेही त्यांनी सांगितले.

काय आहेत तक्रारीतील मागण्या?

– पीडित जेवारी संदीप मडावी यांना सहन कराव्या लागणाऱ्या नाहक त्रासासाठी योग्य आर्थिक भरपाई द्यावी.
– भामरागड भागात विशेषत: पावसाळ्याच्या हंगामात त्वरित आणि पुरेशा आरोग्यसेवा सुविधा पुरवण्याचे निर्देश द्यावेत.
– संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर निष्काळजीपणा आणि रस्ते बांधकामातील विलंब अशा गंभीर मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी आवश्यक कारवाई करावी.
– अशा घटना भविष्यकाळात टाळण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेऊन त्यात सुधारणा कराव्यात.