‘कावड अॅम्ब्युलन्स’ची प्रतिकृती दाखवत काँग्रेसचे धरणे आंदोलन

अपुऱ्या आरोग्य सुविधा पूर्ण करा

गडचिरोली : दुर्गम व मागास जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवले, मात्र प्रत्यक्षात आजही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व पायाभूत सुविधा पूर्णतः विकसित झालेल्या नाहीत. याचा फटका सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी व आदिवासी नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे सांगत बुधवारी काँग्रेसच्या वतीने गडचिरोलीत धरणे आंदोलन करण्यात आले. इंदिरा गांधी चौकात केलेल्या या धरणे आंदोलनात कावड अॅम्ब्युलन्सची प्रतिकृती करून लक्ष वेधण्यात आले.

जिल्ह्यात अपुरे रस्ते व आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना जीव गमवावा लागतो. नुकत्याच एका गरोदर मातेचा व तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पायपीट करत ती महिला पुजाऱ्याकडे गेल्याने प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात असले तरी रस्त्याअभावी अनेक वेळा रुग्णांना कावड करून रुग्णालयात आणावे लागते ही वस्तुस्थिती आहे.

शासनाने तातडीने याची दखल घेऊन जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम व सुरळीत करावी, अतिदुर्गम भागांना जोडणारे रस्ते तयार करून वाहतूक व्यवस्था सुधारावी, तसेच मृत गरोदर मातेच्या कुटुंबाला न्याय व योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनात माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते रामभाऊ मेश्राम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊ वासेकर, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक श्रीकांत देशमुख, किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, पंचायत राज सेलच्या अध्यक्ष माजी जि.प.सदस्य कविता भगत, रोजगार सेलच्या कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनिल कोठारे, राजेश ठाकूर, शंकरराव सालोडकर, हरबाजी मोरे, अब्दुल पंजवानी, भूपेश कोलते, विनोद लेनगुरे, उत्तम ठाकरे, दिवाकर निसार, दिलीप घोडाम, ढिवरू मेश्राम, योगेंद्र झंजाळ, संजय मेश्राम, श्रीनिवास ताडपलीवार, महादेव भोयर, दत्तात्रय खरवडे, रतन शेंडे, श्रीकांत काथोटे, कुलदीप इंदुरकर, अमित तलांडे, नदीम नाथानी, संजय गावडे, भैय्याजी कत्रोजवार, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, निकेश कामिडवार, कुणाल ताजने, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, रिता गोवर्धन, पोर्णिमा भडके, शितल ठवरे, शेवंता हलामी, मीनाक्षी रामटेके, दिनेश सिडाम, जितेंद्र मनगटे, किशोर चापले, संगीता मेश्राम, सुधीर बांबोळे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला यावेळी उपस्थित होते.