गडचिरोली : गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात एसटी बसेस व्यतिरिक्त इतर कोणतेही शासकीय दळणवळणाचे साधन उपलब्ध नाही. मात्र अपुरे चालक-वाहक यामुळे अनेक गावात जुन्या बसेस नियोजीत वेळापत्रकानुसार नियमित व वेळेत धावत नाहीत. काही मार्गावर बसेससुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त आणि सुसज्ज बसेस देण्यासोबत चालक-वाहकांची भरती करा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
नुकत्याच घडलेल्या एका घटनेत गडचिरोली बसस्थानकावर एका जीर्णावस्थेतील बसने महिलेला धडक देऊन इजा पोहोचवली. बरेच वेळा अचानक रस्त्यावरच खराब झालेल्या बसेसमुळे नागरिकांना ताटकळत रस्त्यावर राहावे लागत असल्याचे व्हिडिओ, छायाचित्र सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमातून पुढे येत असतात. या सर्व परिस्थितीमुळे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व शेतकरी यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने व स्वतः राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गडचिरोली जिल्ह्याला अतिरिक्त सुसज्ज अशा बसेस उपलब्ध करून द्याव्या व तातडीने रिक्त असलेल्या चालक व वाहकांची पदभरती करावी. त्यातून एसटी सेवा नियोजित वेळेनुसार नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली.