पेसा क्षेत्रातील रखडलेली पदभरती आता तात्पुरती कंत्राटी पद्धतीने होणार

न्यायालयाचा निकाल लागेपर्यंतची सोय

गडचिरोली : न्यायालयीन प्रक्रियेमुळे गडचिरोलीसह संपूर्ण राज्यातील पेसा क्षेत्रात रखडलेल्या पदभरतीसाठी अखेर राज्य सरकारने पर्यायी मार्ग शोधला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईलपर्यंत पेसा क्षेत्रातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे कंत्राटी पदांनाही नियमित वेतनातील एकत्रित वेतनाएवढे मानधन दिले जाणार आहे. या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक लाभ होणार आहे.

पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय सरकारने घेत राज्यभरातील 6931 जागा भरण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश दिले. काही विभागांनी निवड प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला होता. पण पेसा क्षेत्रात नियुक्तीपत्र देण्यात आले नव्हते. तर काही विभागांनी निकाल तयार करून तो जाहीर केलेला नव्हता. पण आता ती थांबलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करून 8 ऑक्टोबरपर्यंत अनुपालन अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या देण्याचा सरकारचा मानस आहे.

जिल्हा परिषदेने जाहीर केली पदभरतीची गुणवत्ता यादी

गडचिरोली जिल्हा परिषदेने पेसा क्षेत्रातील पदभरतीची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. संबंधित उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीसाठी वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे असे आवाहन सीईओ आयुषी सिंह यांनी केले आहे.

पेसा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त आहेत. आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणी तातडीने करण्यात येत असल्याने गुणवत्ता यादी व दस्ताऐवज पडताळणीचे वेळापत्रक जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या संकेतस्थळावर (www.zpgadchiroli.in) प्रसिध्द करण्यात आले आहे. संबंधित विभागांनी प्रसिध्द केलेल्या गुणवत्ता यादीचे व वेळापत्रकाचे जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या संकेतस्थळावर पाहणी करावी आणि त्यानुसार दस्ताऐवज पडताळणीकरीता सहकार्य करुन आवश्यक दस्तऐवजासह पडताळणीस हजर रहावे. अनुपस्थित राहिल्यास पुनश्च संधी देता येणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळविले आहे.

तलाठी पदभरतीची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

पेसा क्षेत्रातील पदभरतील शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी पदभरतीकरीता गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणी तातडीने करण्यात येत आहे. गुणवत्ता यादी व दस्ताऐवज पडताळणीचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संकेतस्थळावर (https://gadchiroli.nic.in) प्रसिध्द करण्यात आले आहे. उमेदवारांनी गुणवत्ता यादी व वेळापत्रकाची पाहणी करावी व त्यानुसार आवश्यक दस्ताऐवजासह पडताळणीस हजर राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी केले आहे.