गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या १२ वर्षांच्या इतिहासात सर्वात महत्वाचा ठरलेला दीक्षांत समारंभ बुधवारी महामहीम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला. परंतू पदवीदान समारंभात समन्वय आणि नियोजनातील उणिवांमुळे झालेला गोंधळ अनेकांसाठी मनस्ताप देणारा ठरला.
परंपरेप्रमाणे पदवीदान समारंभात प्रत्येक मेरिट (गोल्ड मेडलधारक) आणि पीएचडीधारकांना मंचावर सन्मानजनकपणे बोलवून प्रमुख पाहुण्यांच्या किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पदवी देण्याच्या कार्यक्रमाला बगल देत कार्यक्रम संपल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या कार्यक्रमासाठी लांबून आलेल्या सत्कारार्थी निमंत्रित विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. अखेर ही चूक काही सिनेट सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंच्या हस्ते त्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन समारंभ उरकण्यात आला.
आतापर्यंतच्या प्रत्येक पदवीदान समारंभात सर्वच गोल्ड मेडलधारक आणि पीएचडी पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मंचावर बोलवून सन्मानित करण्यात आले आहे. त्याच परंपरेनुसार याही वेळी त्यांना मंचावर बोलवून सन्मानजनक पदवी प्रदान केली जाईल, असे गृहित धरण्यात आले होते. त्यासाठी सर्वांना निमंत्रित केल्याने मुंबई, बंगलोर, गुजरात येथून ५३ सुवर्णपदक विजेते आणि ५० पेक्षा जास्त पीचएचडीधारक विद्यार्थी कार्यक्रमासाठी आले होते.
राष्ट्रपतींच्या हस्ते केवळ ६ विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल असे कुलगुरूंनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे राष्ट्रपती निघून गेल्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना कुलगुरू आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पदवीदान केले जाईल अशी आशा सर्वांना होती. मात्र तसे काहीच न करता आणि कोणतीही सूचना न देताना कार्यक्रम संपल्याची घोषणा करून सर्वजण राष्ट्रपतींसोबत निघून गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर दिलगिरी व्यक्त करत कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे आणि प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे यांच्या हस्ते पदवी वाटपाचा कार्यक्रम उरकण्यात आला. विशेष म्हणजे ज्या सहा विद्यार्थ्यांना मंचावर बोलवून राष्ट्रपतींच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र द्यायचे होते त्यापैकी एका विद्यार्थिनीला पुन्हा बोलवण्यात आले. त्यामुळे सहाव्या विद्यार्थ्याला (संतोष प्रकाश शिंदे) राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित होण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागले.
या सर्व प्रकाराचा सिनेट सदस्य प्रा.डॅा.दिलीप चौधरी, प्रा.निलेश बेलखेडे, दीपक धोपटे, प्रा.प्रवीण जोगी आणि माजी सिनेट सदस्य प्रा.डॅा.प्रमोद शंभरकर यांनी निषेध व्यक्त करत या प्रकाराची राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रिमोटने अनावरण करण्याचा केवळ देखावा
या कार्यक्रमात विद्यापीठाच्या अडपल्ली येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारत बांधकामासाठी पायाभरणीच्या कोनशिलेचे अनावरण रिमोटच्या माध्यमातून करण्याचा देखावा रंगविण्यात आला. प्रत्यक्षात कोनशिलेवरचा पडदा हटवितानाचा व्हिडीओ आधीच रेकॅार्ड करून तो व्हिडीओ राष्ट्रपतींच्या हस्ते प्ले करण्यात आला. त्यामुळे कोनशिलेचे अनावरण हे केवळ प्रतिकात्मक असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात रिमोटने कोनशिलेवरील पडदा हटविल्याचे भासविण्यासाठी कोनशिला असलेल्या ठिकाणी (अडपल्ली) पोलिसांचा पहारा लावण्यात आला होता.
निमंत्रण पत्रिकेत खासदारांना स्थान नाही
राष्ट्रपतींना गडचिरोली जिल्ह्यात आणण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच सोबत कुलगुरूंनी राष्ट्रपतींची भेट घेऊन रितसर निमंत्रण दिले होते. केंद्र सरकारचे जिल्ह्यातील एकमेव प्रतिनिधी असलेल्या खासदारांना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत मात्र स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे खासदार समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.
पत्रकारांना निमंत्रणच नाही, डिजिटल मिडियाची अँलर्जी
एकीकडे देशात तंत्रज्ञानाचा वापर वाढून सरकारने अनेक व्यवहार डिजीटल केले आहेत. योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठीही डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. एवढेच नाही तर राज्य सरकारने डिजिटल प्रसार माध्यमांना प्रिंट आणि इलेक्ट्रॅानिक्स माध्यमांच्या समकक्ष लाभ देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. मात्र राष्ट्रपतींच्या या कार्यक्रमात मात्र डिजिटल मिडियाला संबंधित यंत्रणेकडून प्रवेश पास नाकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठाकडून प्रत्येक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका सर्व पत्रकारांना दिल्या जातात. पण यावेळी दीक्षांत समारंभासारख्या महत्वाच्या कार्यक्रमाच्या पत्रिका कोणत्याच पत्रकारांना (प्रिंट, इलेक्ट्रॅानिक्स किंवा डिजीटल) मिळाल्या नाही. पत्रकारांसाठी राखीव जागांवर काही राजकीय पदाधिकारी आणि कुटुंबिय बसून होते. त्यामुळे त्या पत्रिका पत्रकारांएेवजी दुसऱ्यांनाच वाटल्या गेल्याचे स्पष्ट झाले.