देलनवाडीच्या अंगणवाडीत निकृष्ट मालाचा पुरवठा?

गावकऱ्यांची तक्रार, पंचनामा करून नमुने तपासणीला पाठविले

आरमोरी : तालुक्यातील देलनवाडीच्या अंगणवाडी क्रमांक १ आणि २ मध्ये पुरवठा करण्यात आलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप तंटामुक्त गाव समितीने केला आहे. या आहारातील तांदूळ व तिखटाचा दर्जा चांगला नसल्याचे आढळल्याने त्यांनी सदर माल अंगणवाडीत न घेता पंचनामा केला. तांदूळ बुरशी लागलेला आणि पाखर झालेला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय मोहुर्ले, सदस्य दिघेश्वर धाईत, राहुल धाईत, अंगणवाडी सेविका रेखा जांभुळे आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कटरे यांनाही बोलविण्यात आले. त्यांनी आहाराचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले.

दरम्यान सरपंच शुभांगी मसराम, प्रमोद खोब्रागडे यांच्यासह काही जागरूक नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) अर्चना इंगोले यांच्याकडे तक्रार करत या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. इंगोले यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले.