गडचिरोली : शहरातील बहुचर्चित गटार लाईनच्या दुरूस्तीच्या कामासाठी आयटीआय चौक ते पंचवटी नगर या मुख्य मार्गावर केलेल्या खोदकामानंतर दिड फुटाचा खड्डा तसाच ठेवण्यात आला. या ठिकाणी खडी आणि बोल्डर चुरी टाकून रस्ता दुरूस्त केल्याचे सोंग केले आहे. मात्र प्रत्यक्षात खड्डा तसाच आहे. आता त्या खड्ड्यात कोणी पडून अपघात झाल्यानंतरच तो दुरूस्त केला जाणार का, असा सवाल राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी उपस्थित केला आहे.

आयटीआय चौक ते पंचवटी नगर या मुख्य रस्त्यावर नगर परिषदेकडून गटार लाईन दुरुस्तीचे काम करून खोदकाम करण्यात आले. त्यानंतर खोदकाम केलेल्या भागात सिमेंट काँक्रिट न करता खडी, बोल्डर चुरी टाकून रस्ता दुरुस्तीचे सोंग करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी दिड फुट खोल खड्डा कायम आहे. याबाबत तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप भरडकर यांनी केला आहे.

































