अहेरी : तालुक्यातील किष्टापूर-कोत्तागुडम ते पत्तीगाव या गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्याची अवस्था सध्या चांगलीच खराब झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखल साचल्यामुळे हा रस्ता आहे, की चिखलणी केलेले शेत, असा प्रश्न पडतो. या रस्त्याची ही दुरवस्था दूर केली नाही तर त्या चिखलात धानाची रोवणी करू आणि त्यातून मिळणारे उत्पन्न महाराष्ट्र शासनाला दान करू, असा इशारा शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी दिला आहे.
या चिखलमय रस्त्यावरून वाहनचालकांसह गावातील शेतकरी, शेतमजूर, शाळकरी विद्यार्थ्यांना जावे लागते. पण रस्त्याच्या दुर्दशेकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याचे खडीकरण आणि मजबुतीकरण करून या भागातील लोकांना सुविधा देणे आवश्यक आहे. मागील दिड वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्याने या क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोणीही लोकप्रतिनिधी नाही. नागरिकांनी आपल्या समस्या कोणापुढे मांडायच्या, असा गंभीर प्रश्न नागरिकांपुढे आहे.
नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी शिवसेना (उबाठा) रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा रियाज शेख यांनी दिला आहे.