गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या समस्या मार्गी लागणार

मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना शिष्टमंडळ.

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रामधील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांच्या रखडलेल्या प्रकल्पांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या नेतृत्वात घेतलेल्या या भेटीत गडचिरोली ते धानोरा मार्गावरील कामाला गती देण्याच्या मागणीसह गडचिरोली-आरमोरी या चारपदरी महामार्गाला मंजुरी दिल्याबद्दल या नेत्यांचे अभिनंदन करून हे काम लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगांव विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे, तसेच गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्ग आणि आरमोरी-गडचिरोली महामार्गासंबंधीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे प्रत्यक्ष भेट घेतली. या चर्चेत व निवेदनाद्वारे क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनमानाशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मांडण्यात आले. या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहानुभूतीपूर्वक चर्चा करत आवश्यक निर्णय घेऊन कामांना गती देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी माजी आमदार भेरसिंह नागपूरे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जेष्ठ नेते झामसिंग येरणे, भाजप नेते घनश्यामजी अग्रवाल, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, जिल्हा सचिव देवेंद्र मच्छीरके, राजेश शिवणकर, कैलास तिवारी, धनलाल मेंढे, संतोष श्रीखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनातून मांडले खालील मुद्दे

1) रावणवाडी(जि.गोंदिया)– कामठा–आमगांव–सालेकसा–दर्रेकसा– पनियाजोब– डोंगरगाव–तुमडी बोर्ड (छत्तीसगड) या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा.

2) देवरी–आमगांव राष्ट्रीय महामार्गावरील बामणी व किडंगीपार येथील रेल्वे क्रॉसिंगवर मंजूर उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरू करावे.

3) आमगांव नगरपरिषद व सातगाव ग्रामपंचायतींशी संबंधित प्रलंबित प्रशासकीय प्रश्न मार्गी लावावेत.

4) धानोरा–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील संथगतीने सुरु असलेले काम गतीमान करावे.

5) गडचिरोली–आरमोरी महामार्ग चारपदरी मंजूर केल्याबद्दल अभिनंदन करून या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली.