गडचिरोलीच्या बायपाससाठी थेट गडकरींना घातले साकडे

मार्ग मंजुरीच्या आशा पल्लवित

गडचिरोली : गडचिरोली शहरातील वाढती वर्दळ लक्षात घेता बायपास मार्ग अत्यंत गरजेचा झाला आहे. त्यामुळे या मार्गाच्या मंजुरीसाठी माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी पुढाकार घेत आता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. या विषयावर चर्चा करताना गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मार्गाला लवकर मंजुरी देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला हा विषय आता मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

गडचिरोलीतील वाढत्या वाहतूक व्यवस्थेतील दडपण आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी स्वतंत्र बायपास रस्त्याची गरज तीव्रतेने भासू लागली आहे. याची जाणीव ठेवून माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना या विषयाचे गांभिर्य सांगितले.

आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित आणि आकांक्षित जिल्हा असलेल्या गडचिरोलीकडे केंद्र व राज्य सरकारचे विशेष लक्ष असते. त्यातूनच जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणल्या गेले आहे. त्यामुळे संपर्क व वाहतूक व्यवस्थेवरील ताण बराच हलका झाला आहे. मात्र गडचिरोली शहरात बायपास मार्ग नसल्यामुळे वाढलेल्या वाहतुकीचा ताण येतो.

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गडचिरोली दौऱ्यावर असताना ना.गडकरी यांनी गडचिरोली शहरासाठी बायपास रस्ता अत्यावश्यक असल्याचे मान्य करत त्यासंदर्भातील आश्वासन दिले होते. गडचिरोली जिल्हा छत्तीसगड, तेलंगणा व आंध्रप्रदेश या तीन राज्यांना जोडतो. तसेच कोनसरीतील लोहप्रकल्प व सुरजागड लोहखाणीसारख्या औद्योगिक प्रकल्पांमुळे वाहतुकीचा भार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहराला वळसा घालणारा स्वतंत्र बायपास मार्ग ही काळाची गरज झाली असल्याचे डॅा.नेते यांनी आपल्या निवेदनात नमुद केले आहे.

या निवेदनाद्वारे डॉ.नेते यांनी बायपास रस्त्याच्या मंजुरीसह त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या भेटीनंतर त्यांनी हे रखडलेले काम आता मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.

या महत्वपूर्ण भेटीप्रसंगी प्रामुख्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, धनंजय पडीशाल्लवार, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीचे आयटी सेल प्रमुख अक्षय उईके, युवा नेते सारंग साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.