गडचिरोली : खरीप हंगामास सुरुवात झाल्याने शेतकरी बांधवांना खत पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये कंपन्याच्या मनमानीमुळे व शासनाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी खताचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप आजाद समाज पार्टीने केला आहे. या संदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्यामार्फत कृषीमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. अशा लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान याची तातडीने दखल घेत कृषी विभागाने तसे पत्र जारी केले. (अधिक बातमी खाली वाचा)

निवेदनात म्हटले आहे की, ज्या कंपनीचे खत मार्केटमध्ये आहे त्या खत पुरवठादार कंपन्या, जसे आर.सी.एफ., कोरोमंडल, एन.एफ.एल.बंबल, इफको, दीपक फर्टीलायझर, पी.पी.एल. अशा कंपन्याची खते रॅक पॉईंटवर येत आहेत, पण या कंपन्या खतासोबत लिंकिंग स्वरूपात अनावश्यक दुय्यम खते, कीटकनाशक, औषधी घेण्यास विक्रेत्यांना जबरदस्ती करत आहेत. जर विक्रेत्यांनी घेण्यासाठी विरोध केला तर खताचा पुरवठा करत नाही. परिणामी विक्रेत्यांना ते घ्यावे लागते. तशीच सक्ती विक्रेते शेतकऱ्यांना सुद्धा करतात. सदर लिंकिंग खताच्या किमतीपेक्षाही जास्त किमतीची सुद्धा असल्याने खतांचा तुटवडा निर्माण होण्यासोबत शेतकरी दोन्ही बाजूने हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांचे हे एक प्रकारे शोषण होत असल्याने त्याला आळा घालण्याची मागणी आजाद समाज पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, सोनाक्षी लभाने, प्रकाश बन्सोड, सतीश दुर्गमवार, धनराज दामले, सुरेंद्र वासनिक आदींनी केली.
कृषी विभागाने घेतली दखल
दरम्यान या मागणीची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी लगेच सर्व खत उत्पादक आणि विक्रेत्यांना पत्र देऊन खताची लिंकिंग होत असल्यास तत्काळ ती थांबवावी, अन्यथा संबंधितांवर कायदेशिर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.