राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे यांची मागणी

गडचिरोली : वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या पहिल्याच पावसात कुरखेडा, भामरागडसह अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. कुरखेडा येतील सती नदीवरील रपटा वाहून गेल्याने साप चावलेला युवक उपजिल्हा रुग्णालयात पोहचू शकला नाही आणि त्याला जीव गमवावा लागला. याच रपट्यामुळे संबंधित गावातील शाळकरी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. भामरागड येते कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे गरोदर महिलेला पूल नसल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने नाला पार करावा लागला. कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर चालू पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलांचे काम सुरू केले. प्रशासन-कंत्राटदार यांनी जाणीवपूर्वक केलेल्या या चुका आहेत. आष्टी-अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामध्ये सुद्धा केंद्र-राज्य सरकार आणि कंत्राटदार दिरंगाई करत आहे. पावसाळा चालू झाल्यापासून सिरोंचा रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली आहे. नागरिकांना ये-जा करण्याकरीता नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे अनेक प्रकार कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे होत आहे. ज्या ठिकाणी रस्ते किंवा पूल वाहून गेले अश्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावे, अशीही मागणी ब्राह्मणवाडे यांनी केली.