कुरखेडा : तालुका मुख्यालयात सती नदीपलीकडे अपघातातील जखमी आणि इतर गंभीर रुग्णांना योग्य वेळात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून गोठणगाव चेक पोस्ट येथे आरोग्य शिबिर लावण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कुरखेडा सती नदीवरील पुलाचे बांभकाम सुरू असल्याने या मार्गावरील रपटा पुरात वाहून जाऊन रहदारी बंद झाली आहे. आंधळी वळण मार्गाने 15 किलोमीटरचा फेरा करावा लागत आहे. मागील 15 दिवसात वैद्यकीय मदत वेळेवर उपलब्ध होत नसल्याने दोन लोकांना आपला जीव गमवावा लागला. लोकांना वेळीच आरोग्य सुविधा मिळावी आणि त्यांचा जीव वाचविता यावा याकरीता 24 तास डॅाक्टरसह रुग्णवाहिका गोठणगाव चेकपोस्ट येथे उपलब्ध असावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शेतात काम करताना सर्पदंश झालेल्या युवकाला वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. परिणामी त्याला जीव गमवावा लागला. एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन सुमारे 4 तास रुग्णवहिका उपलब्ध झाली नाही. परिणामी त्यालाही जीव गमवावा लागला. या सर्व घटनांवरून, रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात पोहचविण्याकरिता होणाऱ्या विलंबामुळे नाहक जीव गमवावा लागल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून गोठणगाव चेक पोस्ट येथे डॅाक्टरसह रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास आरोग्याशी संबंधित सेवा तत्काळ उपलब्ध होईल, अशी मागणी निवेदनातून खा.डॅा.किरसान यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष ईश्वर ठाकूर, उपाध्यक्ष दीपक धारगाये, मीडिया प्रमुख शहेजाद हाश्मी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रांजल धाबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.