ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी भाजप जिल्हाध्यक्षांचे पालकमंत्र्यांना साकडे

घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी

गडचिरोली : राज्य शासनाने राज्यातील सर्वच जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह सुरू झालेले नाहीत. यावर्षी तरी शैक्षणिक सत्राच्या सुरवातीपासून वसतिगृह सुरू करून जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यभरातून ओबिसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊन शासनाने प्रत्येक जिल्ह्यात मुली व मुलांसाठी प्रत्येकी एक असे वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने ओबीसी वसतिगृहाच्या इमारत बांधकामासाठी शासकीय जागेची शोधमोहीम सुरू केली होती. कॉम्प्लेक्स परिसरात जागाही निश्चित करण्यात आल्याचे ऐकण्यात आले होते. मात्र, अजूनपर्यंत कुठेही प्रत्यक्षात वसतिगृहाचे बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील खासगी इमारत भाडेतत्वावर घेऊन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी वाघरे यांनी केली आहे.

खासगी इमारत भाड्याने घ्या

जिल्हा प्रशासनाच्यावतीने अनेक कार्यालये खासगी इमारती भाडेतत्वावर घेऊन कामकाज चालविले जात आहे. त्याच धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मंजूर असलेल्या वसतिगृहासाठी खासगी इमारत भाडेतत्वावर घेऊन वसतिगृह सुरू करावे, अशीही मागणी वाघरे यांनी केली आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी जिल्हा मुख्यालयात येत असतात. त्यांना राहण्याची सुविधा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा मुख्यालयात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.