गडचिरोलीतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करा, शेकापची मागणी

सिग्नल दिसत नसल्याची तक्रार

गडचिरोली : गेल्या काही वर्षात गडचिरोली जिल्हा व शहरातील वर्दळीत वाढ झालेली आहे. त्यातून वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढती वाहनांची वर्दळ आणि अपघातांच्या दुर्घटना थांबवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. (सविस्तर बातमी खाली वाचा)

शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शहरातील गांधी चौकातील सौंदर्यीकरणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे सिग्नल स्पष्ट दिसून येत नाही. परिणामी सिग्नल चालू आहेत की बंद हे न समजल्यामुळे वाहनधारक वेळेच्या आधीच वाहने पुढे काढतात. यातून दुसऱ्या वाहनांना धडकण्याच्या घटना घडतात. त्यामुळे हे सौंदर्यीकरण हटविण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला आपल्या विभागाकडून करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

गांधी चौकातील सिग्नल अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे बंद असतात. अशावेळी वाहतूक शिपायांनी वाहतूक नियंत्रण करणे क्रमप्राप्त आहे, मात्र तसे होत नाही. हे शिपाई वाहतूक नियंत्रण करणे सोडून केवळ चौकातील वाहनांना चलान देण्याच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे अतिरिक्त 4 वाहतूक शिपाई वाहतुकीच्या नियंत्रणाकरिता नियुक्त करावे, जिल्हा न्यायालय जवळील चौक, आयटीआय चौक, कारगिल चौक व शिवाजी महाविद्यालय चौकात वाहतूक नियंत्रणाकरिता शिपाई नियुक्त करण्यात यावेत. दुचाकी, सामान्य नागरिकांच्या चारचाकी वाहनांकडून ज्या पद्धतीने विविध कलमान्वये दंड वसुली करण्यात येते त्याचप्रमाणे शहरातून होणारी अवजड वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक करणारे ट्रॅक्स, ट्रॅव्हल्स, रेती-मुरुमाची तस्करी करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांच्याकडूनही नियमोचित दंड वसुली अभियान नियमित राबविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

बायपास रोडची गरज वाढली

गडचिरोली शहराकरिता मुरखळा- सेमाना- माडेतुकूम- अडपल्ली असा बायपास (रिंग रोड)ची आवश्यकता असून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. शहरातील नागरिकांना सोयीचे होण्याकरिता नगर परिषदेने डीपी प्लाननुसार शहरात सर्विस रोडच्या आवश्यकतेसंबंधात प्रशासनाला कळवावे, अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे. दरम्यान या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन येत्या 15 दिवसांत शहराच्या वाहतुक व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले.