Home पब्लिक प्रॉब्लेम हमीभावाने मका खरेदी करून उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या

हमीभावाने मका खरेदी करून उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या

आम आदमी पार्टीचे निवेदन सादर

कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड झाली असून उत्पादन चांगले आले आहे. मात्र योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांसोबतच मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे आणि हमीभावाने (MSP) शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने कुरखेडा तहसीलदार राहुल पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून करण्यात आली.

सदर निवेदन सादर करताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नासीर हाशमी, जिल्हा सचिव अमृत मेहेर, जिल्हा संघटक ताहीर शेख, कोषाध्यक्ष इरफान पठाण यांच्यासह शेतकरी मनोहर झोडे, योगराज नाकाडे, सचिन झोडे, सोपान इस्कापे, मनोज परशुरामकर, माधव दहीकर, ज्ञानेश्वर गहाणे आदी उपस्थित होते.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कुरखेडा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. साठवणुकीची सोय नसल्याने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मका बाजारात येत असल्याने दर घसरत आहेत. शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागत असून आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाने खरेदी सुरू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

नासीर हाशमी यांनी सांगितले की, “शेतकरी हा जिल्ह्याचा कणा आहे. मका पिकासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जाते, पण योग्य भाव न मिळाल्यास त्यांचे नुकसान होते. प्रशासनाने लवकरात लवकर मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आम्ही यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.”