‘लाडकी बहीण’ योजनेत ऑफलाईन अर्ज भरण्याची सोय व मुदतवाढ द्या

काँग्रेस जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे यांची मागणी

गडचिरोली : राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजने करीता १ जुलैपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला आहे. हे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी दिली आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने अनेक महिला भगिनींना नाहक त्रास करावा लागला. जिल्ह्यातील अनेक भागात इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात हे अर्ज आॅफलाईन भरण्याची सोय करावी आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

15-20 किलोमीटर अंतर कापून महिला अर्ज भरण्याकरीता सेतू केंद्रांवर पोहचत आहेत. त्यामध्ये सुद्धा सर्व्हर डाऊन होऊन महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे नाहीत, ही कागदपत्रे गोळा करण्यात 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे 15 जुलैपर्यंत बऱ्याच महिलांना या योजनेकरीता अर्ज सादर करता येणार नाही. त्यातून जिल्ह्यातील अनेक महिला या योजनेपासून वंचित राहू शकतात. मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थाने जर ही योजना यशस्वी करायची असेल तर कुठल्याही जाचक अटी न ठेवता, गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावे. सोबतच अधिवास प्रमाणपत्रासारख्या कागदपत्राच्या जाचक अटी रद्द करून सरसकट सढळ हाताने मदत करावी. अर्ज सादर करण्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.