अहेरी : वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी वाहनधारकांना सोयीचे व्हावे म्हणून अहेरी किंवा आलापल्ली येथे वाहन तपासणी ट्रॅक बनवावा, अशी मागणी ऑटो चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी धर्मरावबाबा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्याला यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, असे सकारात्मक आश्वासन त्यांनी दिले.
वाहनांचे पासिंग करण्याकरीता सर्व वाहनधारकांना जिल्हा मुख्यालय गडचिरोली येथे जावे लागते. सिरोंचा व भामरागड येथील वाहनधारकांसाठी हे अंतर खूप जास्त पडते. विशेष म्हणजे वर्ष-दोन वर्षातून ऑटो पासिंगसाठी गडचिरोली येथे जाणे अनिवार्य आहे. त्यासाठी संपूर्ण दिवस जातो. हे अहेरी उपविभागातील ऑटो मालक-चालकांसह इतर मोठ्या वाहनधारकांसाठी खूप त्रासदायक होत आहे. त्यामुळे अहेरी-आलापल्ली किंवा परिसरात वाहन तपासणी ट्रॅक मंजूर करावा, अशी मागणी ऑटो युनियनने केली. त्यावर ट्रॅकसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.
या शिष्टमंडळात ऑटो चालक युनियनचे मुख्त्यार शेख, मुस्ताक शेख, शफीक शेख, इबना हुसेन, विनोद कारेंगुलवार, राहुल दुर्गे आदींचा समावेश होता.
ऑटो टॅक्सी चालक-मालक महामंडळ कार्यालय व्हावे
नुकतेच राज्य शासनाने ऑटो, टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ बनविले. त्याचे कार्यालय गडचिरोली येथे उघडण्यात आले नाही. ते कार्यालय गडचिरोली येथे लवकर उघडण्यात यावे अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. त्यावर लवकरच शासन निर्णय घेईल, असे आश्वासन धर्मरावबाबा आत्राम यांनी ऑटो संघटनेला दिले.