कॅाम्प्लेक्सच्या कोपऱ्यातील तलाठी कार्यालय ठरले कुचकामी, शहरात स्थानांतरीत करा

जनकल्याण प्रतिष्ठानची प्रशासनाकडे मागणी

गडचिरोली : शहरातील चंद्रपूर मार्गावरच्या कॅाप्लेक्स परिसरातील तलाठी कार्यालय नागरिकांच्या गैरसोयीचे आहे. त्यामुळे हे कार्यालय मुख्य शहरात स्थानांतरीत करावे, अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.

जिल्हा निर्मितीपासून गडचिरोली शहरात गडचिरोली व रामपूर तुकूम अशी दोन तलाठी कार्यालये होती. परंतु काही वर्षापूर्वी ती कॅाम्प्लेक्स परिसरात आटीआय चौक ते जिल्हाधिकारी निवासस्थान या रस्त्यावर समाजकल्याण कार्यालयामागील भागात स्थानांतरीत करण्यात आली. गडचिरोली शहरातील गोकुळनगर, रामनगर, लांजेडा व इतर भागातील गोरगरीब नागरिकांना कॅाम्प्लेक्स भागातील त्या तलाठी कार्यालयात जायचे तर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आॕटोरिक्षासाठी 30 रुपये जाणे आणि 30 रुपये येण्यासाठी असे 60 रुपये खर्च करावे लागतात. अनेकदा तलाठी हजर नसल्यामुळे पुन्हा-पुन्हा जावे लागते.

गोरगरीब नागरिकांची अडचण लक्षात घेऊन ही दोन्ही तलाठी कार्यालये तहसीलदार कार्यालयाजवळ किंवा राजस्व बचत भवनात स्थानांतरीत करावी, अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली, तसेच प्रा.अशोक लांजेवार व शिवराम कुमरे यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांना दिले आहेत.