रामपुरात आतापर्यंत डेंग्युचे 15 रुग्ण आढळले, आणखी 16 नमुने पाठवले प्रयोगशाळेत

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली भेट

रामपूर येथे भेट देऊन पाहणी करताना जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य पथक

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामपूर या गावात डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. या गावात आतापर्यंत 15 रुग्ण आढळले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय आणखी 16 संशयितांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांनी या गावाला भेट देत उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रामपूर या गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणेने तातडीने सतर्क होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. सध्या आष्टी ग्रामीण रुग्णालयात 9 रुग्ण उपचार घेत आहेत. एकाला सुटी देण्यात आली आहे.

वास्तविक डासजन्य आजार नियंत्रणासाठी जि.प.च्या आरोग्य विभागाने आधीच मोहीम सुरू केली आहे. पण पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूने डोके वर काढल्याने चामोर्शी तालुक्यात साथरोग नियंत्रण उपाययोजना कुचकामी ठरल्याचे दिसून येते. रामपूर येथे 22 मे पासून डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान गावात धूळ फवारणीचे दोन राऊंड झाले असून कोरडा दिवसही पाळला जात आहे. संशयित रुग्णांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणी पाठविले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.शिंदे यांनी सांगितले.