कंत्राटदारांच्या थकित बिलांसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार

आ.धर्मरावबाबा आत्राम यांची ग्वाही

गडचिरोली : एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून झालेल्या कामांची प्रलंबित असलेली बिलं मिळण्यासाठी जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्कल आॅफिससमोर दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. बुधवारी संध्याकाळी या आंदोलनाच्या सांगताप्रसंगी माजी मंत्री, आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट दिली. गडचिरोली जिल्ह्यात कामे करणे कंत्राटदारांसाठी जोखमीचे असते. या मागास भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कामेही होणे गरजेचे आहेत. त्यामुळे झालेल्या कामांची बिलं शक्य तितक्या लवकर देण्यासाठी मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्‍यांकडे पाठपुरावा करेन, अशी ग्वाही यावेळी धर्मरावबाबांनी दिली.

गडचिरोली जिल्ह्यात रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 375 कोटींची बिलं, इमारतींच्या कामांची 83 कोटींची बिलं, तसेच आदिवासी विकास विभागामार्फत झालेल्या कामांची 700 कोटींपेक्षा अधिकची बिलं, अशी एकूण 1100 कोटींपेक्षा अधिक रकमेची बिलं प्रलंबित आहेत. त्या बिलांसंदर्भात वेळोवेळी शासकीय बैठकांमधून वरिष्ठ स्तरावर माहिती देऊन त्यासाठी निधीची मागणी केली जात असल्याचे यावेळी अधीक्षक अभियंता नीता ठाकरे-मोहोड यांनी सांगितले. त्यांनीही धरणे मंडपाला भेट देऊन कंत्राटदारांचे निवेदन स्वीकारले.

यावेळी माजी आ.डॅा.देवराव होळी यांनीही कंत्राटदारांची भेट घेतली. जिल्ह्यात विपरीत परिस्थितीत कंत्राटदार कामं करत असल्याने त्यांची बिलं रोखल्या जाऊ नये, यासाठी आपण मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांची भेट घेऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.