गडचिरोली : अहेरी येथील पीएम श्री मॉडेल स्कूल या शासकीय शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठल्यानंतर शुक्रवारी माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विधिमंडळाच्या सभागृहात या विषयावर औचित्याचा मुद्दा मांडला.
मॉडेल स्कूलमध्ये कायमस्वरूपी शिक्षकांची भरती व्हावी अशी मागणी यावेळी आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी करून सभागृहाचे लक्ष वेधले. गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता आहे, त्यातच मॉडेल स्कूल हे जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या जाते. जिल्हा परिषद शाळेतच शिक्षकांची कमतरता असल्याने आणि प्रतिनियुक्तीवर मॉडेल स्कूल चालविले जात असल्याने सद्यस्थितीत केवळ 3 शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिवेशनात मॉडेल स्कूलविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे मॉडेल स्कूलमध्ये शिक्षकांच्या भरतीसंबंधीचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा पल्लवीत झाली आहे.