मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली पूरग्रस्त भामरागडमध्ये घरांची पाहणी

पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश

गडचिरोली : चार-पाच दिवस सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येवून जिल्ह्याच्या अनेक भागात आणि विशेषत: दक्षिण भागात घरे आणि शेतीचे नुकसान झाले. या पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना नुकसानभरपाई देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

धर्मरावबाबांनी शुक्रवारी भामरागड येथे पूरपरिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूषण चौधरी, नायब तहसीलदार रेखा वाणी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भामरागड परिसरात आणि छत्तीसगडच्या हद्दीत झालेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला मोठा पूर आला होता. या पुराचे पाणी भामरागड तालुक्यातील अनेक गावात शिरले. त्यामुळे शेती व घरांची हानी झाली आहे. सध्या पाऊस थांबल्याने पुराचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे ना.आत्राम यांनी नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पूरपरिस्थितीदरम्यान मंत्री धर्मरावबाबा भ्रमणध्वनीद्वारे नागरिकांच्या संपर्कात होते. शुक्रवारी नागपूरवरून थेट भामरागड गाठत त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, नायब तहसीलदार रेखा वाणी, नायब तहसीलदार मोरेश्वर मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, नगरपंचायतचे मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूषण चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार, जेष्ठ कार्यकर्ते सब्बर बेग मोगल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालयाला दिली भेट

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भामरागड तालुका मुख्यालयातील विविध प्रभागात भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. येथील नागरिकांशी आस्थेने संवाद साधला. दरम्यान त्यांनी तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी मंतोश्री गजेंद्र चौधरी (२४) रा.आरेवाडा या मातेशी संवाद साधत प्रकृतीबाबत विचारपूस केली. याच महिलेला प्रसुतीदरम्यान अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे दुर्मिळ बी-निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या पिशवीची गरज होती. पोलीस आणि महसूल प्रशासनाने पुढाकार घेत हेलिकॅाप्टरने रक्ताची पिशवी पोहोचवून देत त्या महिलेचे प्राण वाचविले होते.