अहेरीतील अतिक्रमण हटवून करणार रस्त्यांचे रुंदीकरण

आ.धर्मरावबाबा यांचे निर्देश

अहेरी : राजनगरी अहेरीला सुंदर आणि सुटसुटीत शहर बनवण्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे निर्देश त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.

अहेरी शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मोजणी करून सीमांकन निश्चित करावे, असे निर्देश धर्मरावबाबांनी दिले. रस्त्याच्या कडेला असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. केवळ रस्तेच नव्हे, तर वनविभागाच्या जागेवर झालेले अतिक्रमणही काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

पर्लकोटा पुलाचा मार्ग मोकळा

भामरागड येथील पर्लकोटा नदीवरील पुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात संपर्क तुटण्याच्या समस्येवर उपाय म्हणून नवीन पुलाचे काम सुरू झाले होते, मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे ते रखडले होते. आता तक्रारदारांनी केस मागे घेतल्याने कामातील अडथळा दूर झाला आहे.
विशेष बाब म्हणजे ज्या लोकांची दुकाने अतिक्रमणात जाणार आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना पर्यायी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आ.डॉ.आत्राम यांनी दिले आहेत.

आलापल्लीकरांना ‘प्रॉपर्टी कार्ड’

आलापल्ली येथील सुमारे 3,500 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच त्यांना त्यांच्या हक्काचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ वाटप केले जाणार आहे. तसेच, आलापल्ली येथील वीर बाबुराव चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या बैठकीला प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा, मुख्याधिकारी गणेश शहाणे, गटविकास अधिकारी गणेश चव्हाण, नायब तहसीलदार नरेंद्र दाते, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक जी.बी. रणदिवे, पोलीस निरीक्षक हर्षल एकरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.