देसाईगंज : आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने भोई, ढिवर व गोपाळ या भटक्या जमातीचे वास्तव्य आहे. परंतू ते शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित होते. आ.कृष्णा गजबे यांनी ही बाब शासनस्तरावर मांडून पाठपुरावा केल्याने या सर्व वंचित नागरिकांना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अनुसूचित जातीकरीता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरीता शबरी आवास योजना, भटक्या जमातीतील धनगर समाजाला अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनेतील राहीलेल्या ओबीसी समाजाकरीता मोदी आवास योजना राबविण्यात येत आहे. परंतु भटक्या जमाती ब प्रवर्गात मोडणाऱ्या भोई, ढिवर व गोपाळ समाजातील नागरिक हक्काच्या घरापासून वंचित होते. त्याकरिता इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना राबविण्यात येते. सदर योजनेचा लाभ मिळावा यासाठी आरमोरी तालुका 52, देसाईगंज तालुका 100, कुरखेडा तालुका 23 लाभार्थ्यांसह जिल्ह्यातील एकुण 440 नागरिकांनी पंचायत समितीमार्फत अर्ज सादर केले होते. परंतु जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला तरी त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.
ही बाब निदर्शनास येताच आमदार कृष्णा गजबे यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग गडचिरोली यांना प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र अर्जांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना केली. त्यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या प्रशासकीय मान्यता आदेशासह पंचायत समितीनिहाय 440 लाभार्थ्यांची यादी शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आली.
सदर प्रस्तावास मंजुरी देण्याकरिता आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन त्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची विनंती केली. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव यांना मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे लेखी निर्देश देण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील भोई, ढिवर व गोपाळ समाजातील नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेतून हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.