गडचिरोली : एस.टी.महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघटनेची बैठक माजी खासदार तथा भाजप नेते डॉ.अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एस.टी.महामंडळ सेवा सुधारणा व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
गडचिरोली विभागातील कर्मचारी व प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेच्या वतीने ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या प्रारंभी संघटनेच्या वतीने डॉ.अशोक नेते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक सेवेसाठी त्यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल गडचिरोली आगाराचे विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यानंतर सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या सन 2025 च्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. तसेच गडचिरोली एस.टी. महामंडळातील कर्मचारी आणि प्रवाशांच्या समस्या याविषयी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करून चर्चा करण्यात आली.
यावेळी विभागीय अध्यक्ष मा.खा.डॉ.नेते यांनी गडचिरोली आगारातील बससेवेच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेत विद्यार्थ्यांसाठी प्रवास अधिक सुलभ करण्याच्या उपाययोजनांवर भर दिला. नवीन बसेसची उपलब्धता, वेळेवर सेवा देण्याची गरज आणि प्रवाशांना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळणे, बसेसची संख्या वाढवणे आणि प्रवास अधिक सोयीस्कर करण्यावर भर दिला गेला. विभागीय अधिकाऱ्यांनी या मुद्द्यांवर सकारात्मक विचार करत शक्य तितक्या लवकर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाचे कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यात प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीमुळे गडचिरोली विभागातील एस.टी. कर्मचारी व प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीला विभागीय कार्याध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपचे सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तसेच एस.टी.आगाराचे अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.